सवदींनी मांडली जनतेच्या मनातील खदखद
बेळगाव : उत्तर कर्नाटकचा विकास व्हावा, यासाठी बेळगावात अधिवेशन भरविले जाते. मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये उत्तर कर्नाटक विकासाबाबत काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे विधानपरिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांनी हे अधिवेशन म्हणजे सहलीचे आयोजन असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे. तेव्हा उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत गांभीर्याने चर्चा करावी, अशी मागणी केली. जणू त्यांनी या अधिवेशनाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून साऱयांनाच विचार करण्यास भाग पाडले.
सोमवारी पहिल्या सत्राला सुरुवात झाली. सुरुवातीलाच काँग्रेसच्या सदस्यांनी उत्तर कर्नाटक विकासासंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. मात्र अचानक त्याची कशी आठवण झाली? जनतेमध्ये काय बोलले जाते, जनता किती नाराज आहे? हे लक्ष्मण सवदी यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या सदस्यांनी धरणे आंदोलन धरल्यानंतर सभापती बसवराज होरट्टीदेखील नाराज झाले. कोणत्या कारणासाठी तुम्ही धरणे आंदोलन धरत आहात? असे काँग्रेसच्या सदस्यांना विचारले. यावर भाजपमधील एका मंत्र्याने केलेल्या जमीन घोटाळय़ासंदर्भात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी पुन्हा रेटून धरली.
तीन वर्षांनंतर अधिवेशन भरविले जात आहे. उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा झाली पाहिजे, असा आग्रह साऱयांनीच धरला. याचबरोबर म. ए. समितीबाबतही सकाळच्या सत्रामध्ये जोरदार चर्चा झाली. त्या गुंडांच्याबाबत कारवाई झाली पाहिजे. मात्र गृहमंत्री आणि सरकार त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यास तयार नाही. असे म्हणत सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुपारी याबाबत गृहमंत्री येतील आणि उत्तर देतील, असे सांगण्यात आले.
शनिवार-रविवारी गोव्यात मौजमजा करतात!
लक्ष्मण सवदींनी मात्र अधिवेशन कशासाठी घेतले जाते? याची जनतेमध्ये असलेली चर्चा सांगून साऱयांनाच आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. बेंगळूरवरून येथे सहलीसाठी येतात. शनिवार-रविवारी गोव्याला जातात आणि मौजमजा करतात, असे जनता ठामपणे सांगत आहे. असे सांगून उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.