बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये मंगळवारपासून सैन्य भरतीला सुरुवात झाली. इन्फंट्रीच्या शिवाजी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक राज्याला वेगवेगळा दिवस देण्यात आल्याने काही मोजकेच युवक भरतीसाठी दाखल होत आहेत. आजी-माजी सैनिकांची मुले, भाऊ, वीर पत्नींची मुले, राज्य व राष्ट्रीय खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खेळाडूंची भरती प्रकिया पार पडली. बुधवारी महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांची भरती प्रक्रिया पहाटेपासूनच सुरू करण्यात आली होती. यामुळे बस, रेल्वेने युवक बेळगावमध्ये दाखल होऊ लागले आहेत. दरवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्रीने योग्य नियोजन केले आहे. पहाटेपासूनच या भरती प्रक्रियेला सुरुवात केली जात असून कागदपत्रांची तपासणी प्रथमत: केली जात आहे. या उमेदवारांना कोरोना चाचणीही सक्तीची करण्यात आली आहे.
अशी होणार भरती प्रक्रिया
आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी गुरुवार दि. 17 पासून भरती प्रक्रिया होणार आहे. 17 व 18 रोजी महाराष्ट्र तर 19 नंतर मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक व आंध्रप्रदेशमधील युवक सहभागी होतील. 21 रोजी सोल्जर टेड्समन पदासाठी महाराष्ट्र तर 22 रोजी इतर राज्यांतील उमेदवार भाग घेऊ शकणार आहेत. 23 रोजी सोल्जर क्लर्क व स्टोअर कीपर पदासाठी भरती होणार असून, मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे व निवृत्त जवानांच्या मुलांनाही संधी मिळणार आहे. 31 जानेवारीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.









