टाटा पॉवरने गोगटे उर्जाच्या सहकार्याने सुरू केले स्टेशन
प्रतिनिधी/ बेळगाव
टाटा पॉवरने बेळगावमध्ये इलेक्ट्रीक वाहनांसाठीचे पहिले फास्ट चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. काकती येथील गोगटे प्लाझा येथे सौर उर्जेवर चालणाऱया या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन शुक्रवारी झाले. केएलईचे चेअरमन प्रभाकर कोरे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर व महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले मुंबईत पांडुरंग शास्त्री आठवले यांना रावसाहेब गोगटे यांच्या नावे पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी आपल्याला देशपांडे नावाचे शास्त्रज्ञ भेटले होते. त्यांनी भारतामध्ये प्रचंडप्रमाणात सौर उर्जा असून, त्याचा वापर केला पाहिजे असे सांगितले होते. गोगटे कुटुंबियांनी टाटापॉवरच्या सहकार्याने या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभाकर कोरे म्हणाले यापुढे वाहनांना सुद्धा सौर उर्जेचा वापर करून लहान वाहनांसोबतच मोठी वाहने देखील चालविली जाणार आहेत. सौर उर्जेचा वापर करून ट्रक्टर चालविण्याचा प्रयोग केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री जयंत पाटील यांनी किरण ठाकुर व प्रभाकर कोरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. मान्यवरांच्या हस्ते परिसरात असणाऱया शिरीष गार्डनचे उद्घाटन करून ते जनसेवेत रूजु करण्यात आले.
टाटा पॉवरने आतापर्यंत देशातील 120 शहरांमध्ये 600 चार्जिंग सेंटर सुरू केली आहेत. बेळगाव येथील चार्जिंग सेंटर हे काकती जवळील हॉटेल मॅरिएट नजिक आहे. सौर उर्जेचा वापर करून या स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. दुचाकी, तीन चाकी, व चार चाकी वाहनांना याठिकाणी चार्जिंग करता येणार आहे.
अरविंद गोगटे यांनी रेल्वेस्टेशन परिसरात एक्सिलेटर बसविण्यासाठी निधी पाठविण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडिअर रोहित चौधरी, त्यांच्या पत्नी चारू चौधरी, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, केएलईचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, शिरीष गोगटे, माधव गोगटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.









