पेट्रोलचीही 110 कडे वाटचाल
प्रतिनिधी /बेळगाव
क्रिकेटमध्ये खेळाडूने शतक मारल्यानंतर आपल्याला अत्यानंद होतो. परंतु वाहनांसाठी लागणाऱया डिझेलच्या दराने शतक पार केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बेळगावमध्ये रविवारी डिझेलचा दर प्रति लिटर 100.14 रुपये झाल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे ही इंधन दरवाढ केव्हा कमी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील 4 ते 5 महिन्यांपासून सतत इंधनाची दरवाढ सुरू आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या दरात वाढ झाल्याने डिझेल दर वाढल्याचे कारण केंद्र सरकारकडून दिले जात असले तरी यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलने शतक पार केल्यानंतर आता डिझेलनेही बेळगाव शहरात शतकी आकडा पार केला आहे.
वाहतूक व्यवस्था ही डिझेलवर अवलंबून असते. चार चाकी, सहा चाकी, आठचाकी, बारा चाकी वाहने डिझेलवर चालतात. याच वाहनांमधून धान्य, दैनंदिन वापरातील वस्तू यांची ने आण होते. त्यामुळे येत्या काळात भाज्यांसह इतर सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. डिझेलचे दर नियंत्रणात आणावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
ज्या मानाने डिझेलचा दर वाढला त्या मानाने भाडे वाढविले जात नसल्याची तक्रार वाहनचालकांमधून करण्यात येत आहे. त्यामुळे डिझेल व पेट्रोलचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी होत आहे.
पेट्रोलचा दर 110 कडे
पेट्रोलचा दर मागील काही दिवसांपासून 104 वर स्थिर होता परंतु मागील आठ दिवसांपासून पुन्हा एकदा दर वाढीला सुरुवात झाली आहे. रविवारी पेट्रोलचा दर 109 रुपये 24 पैसे इतका उच्चांकी पोहोचला. हा दर यापेक्षाही वाढेल असा अंदाज जाणकारांमधून सांगण्यात येत आहे.
| शहर | पेट्रोल दर | डिझेल दर |
| बेळगाव | 109.24 | 100.14 |
| पणजी | 103.59 | 99.93 |
| कोल्हापूर | 111.84 | 101.04 |









