जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती : लायन्स क्लबतर्फे 52 लाखाचे साहित्य केएलईकडे सुपूर्द
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच कठीण असा आहे. बेळगावमध्ये मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती. परंतु प्रशासन व डॉक्टरांनी घेतलेल्या मेहनतीमुळे सध्या 2 टक्क्मयांपेक्षाही खाली कोरोना रुग्णांची संख्या आली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात 24 हजार 500 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 24 हजार व्यक्तींवर उपचार झाले असून 500 व्यक्तींवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
लायन्स क्लब बेळगावच्यावतीने व मुंबई येथील टाटा एज्युकेशन ऍण्ड डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या सहकार्याने बुधवारी केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलला 52 लाख रुपयांच्या वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. नेहरुनगर येथील केएलई शताब्दी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मल्टिपल कौन्सिलचे चेअरमन डॉ. नागराज बैरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, माजी प्रांतपाल श्रीकांत मोरे, माजी प्रांतपाल सुगल्या यलमल्ली, केएलई हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. एस. मुधोळ, उपक्रमाच्या समन्वयिका व माजी प्रांतपाल मोनिका सावंत उपस्थित होत्या.
आजवर स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांचा इतिहास सांगितला जात होता. परंतु या पुढील काळात कोरोनाच्या महामारीतही जीवाची बाजी लावून काम केलेल्या व्यक्तींचा इतिहास सांगितला जाईल. डॉक्टर, नर्सेस, पोलीस यासह इतर क्षेत्रात काम केलेल्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल, असे विचार डॉ. पी. आर. एस. चेतन यांनी मांडले. उपक्रमाच्या समन्वयिका मोनिका सावंत प्रास्ताविकात, टाटा एज्युकेशन ऍण्ड डेव्हल्पमेंट ट्रस्टने केएलई हॉस्पिटलच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पीपीई किट, एन95 मास्क, सर्जिकल मास्क, मेडिकल ग्लोव्ज असे एकूण 52 लाखाचे साहित्य दिल्याचे सांगितले.
डॉ. एम. व्ही. जाली यांनी केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. या कार्यक्रमाला माजी प्रांतपाल अरविंद देशपांडे, श्रीनिवास शिवणगी, श्रीकांत शानभाग यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, केएलईचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.