पहिल्या दिवशी 341 प्रवाशांनी केला प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळावर सोमवारी 189 आसनी बोईंग विमान दाखल झाले. दिल्ली-बेळगाव या मार्गावर सेवा देणाऱया स्पाईस जेट कंपनीने प्रवाशांची संख्या वाढल्याने मोठी एअरबस सुरू केली आहे. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअरबस दाखल झाली आहे. पहिल्या दिवशी 341 प्रवाशांनी या एअरबसने प्रवास केला.
स्पाईस जेट कंपनीने 13 ऑगस्टपासून बेळगाव-दिल्ली या मार्गावर आठवडय़ातून दोन दिवस विमानफेरी सुरू केली. सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस सेवा दिली जात होती. त्यावेळी 149 आसनी एअरबस दाखल होत होती. बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली. विमानांतून पूर्ण क्षमतेने प्रवासी प्रवास करीत असल्याने कंपनीने मोठी एअरबस सोडण्याचा निर्णय घेतला.
सोमवारपासून 189 आसनी विमान सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी 161 प्रवासी या विमानाने दिल्ली येथून बेळगावला आले. तर 180 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले. आसन क्षमता वाढविल्यामुळे प्रवाशांनाही प्रवास करणे सोयीचे होत आहे. प्रतिसाद चांगला मिळत असल्याने ही विमानसेवा दररोज सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
आता गुरुवारीही करा दिल्ली विमानप्रवास यापूर्वी केवळ सोमवार व शुक्रवार असे आठवडय़ातील दोनच दिवस बेळगाव-दिल्ली असा विमानप्रवास करता येत होता. प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे आता गुरुवारीदेखील प्रवाशांना सेवा मिळणार आहे. त्यामुळे आठवडय़ातून तीन दिवस दिल्लीचा प्रवास करता येणार आहे. अवघ्या अडीच तासांमध्ये दिल्लीला पोहोचता येत असल्याने प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.