2,800 कोटी रुपयांची तरतूद : निपाणी-चिकोडी, संकेश्वर-मुरगुंडी महामार्गाचे रुंदीकरण होणार
वार्ताहर / हुबळी
उत्तर कर्नाटकातील 847 किलोमीटर लांबीच्या 13 महामार्ग प्रकल्पांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून 21 हजार कोटी रुपये खर्चून त्यांचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये चौपदरी बेळगाव रिंगरोडचाही समावेश आहे. 69 कि. मी. लांबीच्या या महामार्गासाठी तीन टप्प्यात 2,800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच बेळगाव-रायचूर, निपाणी-चिकोडी, संकेश्वर-मुरगुंडी, नागसनूर-इंडी आणि इंडी क्रॉस-विजापूर आदी मार्गांच्या रुंदीकरणावरही कोटय़वधी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच हुबळी-धारवाड बायपास आणि बेळगाव-रायचूर महामार्ग रुंदीकरण व नरगुंद व नवलगुंद शहरांसाठीचा बायपास रस्ता व इतर कामांचाही समावेश आहे.
उत्तर कर्नाटक भागातील 21 हजार कोटी रुपये अनुदानातून निर्माण होणाऱया 847 किलोमीटर लांबीच्या मार्गांसाठीच्या 13 योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केली. हुबळीतील चन्नम्मा सर्कलमध्ये 323 कोटी रुपये खर्चातून निर्माण होणाऱया एलिवेटेड कॉरिडोर आणि कलघटगी तालुक्यातील दास्तीकोप्प येथील बेडती कालव्यावरील पूल निर्मितीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते.
कर्नाटकातील महामार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. उत्तर कर्नाटकच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी महामार्गाची पायाभूत सुविधा सुधारणे फार महत्त्वाचे असल्याने रस्ते-महामार्ग मंत्रालयाने मागील तीन वर्षात 627 किलोमीटर लांबीच्या महामार्गाची घोषणा केली आहे. या भागात महामार्ग विकसित झाल्यानंतर रस्त्यांचे जाळे सुधारण्याबरोबरच शेजारील महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमधील संपर्कयंत्रणाही मजबूत होईल, असा दावा गडकरी यांनी केला.
हुबळी-होस्पेटसह उत्तर कर्नाटकातील प्रगतीपथावर असणाऱया योजना देखील लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.