फळ व्यापाऱयाची फसवणूक केल्याचा आरोप : सायबर क्राईम विभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील एका युवकाला फसवणूक प्रकरणी मध्यप्रदेशमध्ये अटक झाली आहे. उज्जैन येथील एका फळ व्यापाऱयाला फसविल्याच्या आरोपावरून सायबर क्राईम विभागाने ही कारवाई केली असून त्याने केवळ मध्यप्रदेशच नव्हे तर देशभरातील विविध ठिकाणी फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
उज्जैनमधील स्थानिक दैनिकांत यासंबंधीचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. सलमान या फळ व्यापाऱयाला एक ट्रक टरबूज पाठवण्याचे सांगून सव्वालाख रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर फळे पाठविली नाहीत. त्यामुळे सलमान यांनी सायबर क्राईम विभागाचे पोलीस प्रमुख जितेंद्रसिंह यांच्याकडे तक्रार केली होती.
सोशल मीडियावर पोस्ट टाकून हा व्यवहार ठरविण्यात आला होता. आगाऊ रक्कम जमा करण्याचे सांगून बेळगाव येथील मोहम्मदअजर या युवकाने रक्कम जमा झाल्यानंतर फळे पाठविली नव्हती. त्यामुळे यासंबंधी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. उज्जैन येथील सायबर क्राईम विभागाने महम्मदअजरला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने देशभरात असे अनेक प्रकार केल्याची कबुली दिली आहे.
अजरचे वडीलही फळ व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरील जाहिराती पाहून फळांची ऑर्डर दिली होती. चंदिगढमधील ठकसेनांनी तीन लाख रुपये भरून घेऊन फळे न पाठविता त्यांची फसवणूक केली होती. पैशाची मागणी केल्यानंतर त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले होते.
सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती…
स्वतः फसल्यानंतर मोहम्मदअजरने दुसऱयांना फसविण्याचा उद्योग सुरू केला. त्याच पद्धतीने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून देशभरातील 15 ते 20 जणांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली आहे. उज्जैनमधील सायबर क्राईम विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.









