कैलास पाटील उत्कृष्ट खेळाडू, ज्ञानेश सावंत, किरण चव्हाण, रघु आनंदाचे यांनाही पुरस्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथील शिवसेना आयोजित युवा सेना स्पोर्ट्स क्लब आयोजित निमंत्रितांच्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दादा फुटबॉल क्लब बेळगाव संघाने प्रॅक्टिस क्लब कोल्हापूर संघाचा 1-0 असा पराभव करून युवा सेना चषक पटकाविला. किरण चव्हाण याला उत्कृष्ट बचावपटू, ध्यानिश सावंत याला उत्कृष्ट गोलरक्षक तर कैलास पाटील कोल्हापूर याला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
गडहिंग्लज येथे युवा सेना कोल्हापूर जि. ग्रामीण आयोजित आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केबीआर गडहिंग्लज संघाचा टायब्रेकरमध्ये 6-5 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत 35 व्या मिनिटाला गडहिंग्लजच्या रमेशने पहिला गोल केला. खेळ संपण्यास काही सेकंद बाकी असताना राहूल आनंदाचेने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. त्यामुळे पंचांनी टायबेकर नियमाचा वापर केला. त्यात त्यांनी 6-5 असा पराभव केला. दुसऱया उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रॅक्टिस क्लब कोल्हापूर संघाने गडहिंग्लज युनायटेड संघाचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरतर्फे कैलास पाटीलने 2 गोल केले.
अंतिम सामन्यात दादा फुटबॉल क्लब बेळगाव संघाने प्रॅक्टिस क्लब कोल्हापूर संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात 53 व्या मिनिटाला राहुल गुरवच्या पासवर रघु आनंदाचेने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिस क्लब कोल्हापूर संघाने गोल करण्याचे प्रयत्न केले पण दादा फुटबॉल क्लब संघाच्या बचाव फळीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.
तिसऱया नंबरसाठी झालेल्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड संघाने केबीआर गडहिंग्लज संघाचा 4-0 असा पराभव केला. गडहिंग्लजतर्फे ओंकार जाधव, अभिषेक पवार यांनी प्रत्येकी 1 तर अनिकेत कोरेने 2 गोल केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या दादा फुटबॉल क्लब बेळगाव संघाला 55 हजार रोख, आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला
प्रॅक्टिस क्लबला 33 हजार 333 रूपये व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक पटकाविलेल्या गडहिंग्लज युनायटेड संघाला 22 हजार 222 रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ज्ञानेश सावंत (दादा क्लब), उत्कृष्ट फॉरवर्ड रघु आनंदाचे, उत्कृष्ट डिफेंडर किरण चव्हाण, तर स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून कैलास पाटील (कोल्हापूर) यांना चषक देऊन गौरविण्यात आले.









