क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचा आघाडीचा स्केटिंगपटू अभिषेक नवले याने 100 मी. स्क्वॉड स्केटिंगमध्ये 12.97 वेळेत अंतर पूर्ण करून नवीन विश्वविक्रम नोंदविला आहे. यापूर्वीचा ऑस्ट्रेलियाचा डेविड सॅलिबरीचा 13.24 हा वेळेचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या या विक्रमामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असून पुढील विक्रमासाठी त्याची तयारी सुरू आहे, असे प्रतिपादन स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ऑस्ट्रेलियाच्या मुला डेविड सॅलिबरने दोन वर्षामागे 100 मी. स्क्वॉड स्केटिंगमध्ये 13.24 हा वेळ नोंदवून विक्रम स्थापित केला होता. गेली दोन वर्षे हा विक्रम मोडीत काढण्यासाठी अनेक स्केटिंगपटूंनी प्रयत्न केला. बेळगावचा स्केटिंगपटू अभिषेक नवले याने परवाच झालेल्या एका स्पर्धेत 12.97 इतक्या कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून डेविड सेलिबरचा विक्रम मोडित काढला. या विक्रमानंतर या विक्रमाची गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड 2020 च्या बुकात नोंद झाली आहे. हा विक्रम स्थापन करण्यासाठी गेली तीन वर्षे अभिषेक नवले जिद्दीने सराव करीत होता. त्याला यश प्राप्त झाले आहे.यापूर्वी अभिषेकने पोर्तुगाल येथे दहावी आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत विक्रम नोंदविला होता. त्याचप्रमाणे लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड, कर्नाटक राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला आहे. बेंगळूर ते बेळगाव 540 कि.मी. चे स्केटिंग रॅली, त्याचप्रमाणे बेळगाव ते दिल्ली 2000 कि.मी. ची रॅली त्याने यशस्वीरित्या पार करून पर्यावरणाची जागृती केली होती. त्याच्या या यशात उमेश कलघटगी, सूर्यकांत हिंडलगेकर, वडील संजय नवले त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत प्रवीण हिरेमठ, विजया हिरेमठ, सी. एस. बिदनाळ आदी उपस्थित होते.









