प्रतिनिधी / बेळगाव
मूळच्या बेळगाव व सध्या मुंबईस्थित असणाऱया रती शरद हुलजी यांची राज्यस्तरीय मिस इंडियाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. कर्नाटकातून निवडण्यात आलेल्या अंतिम 5 मध्ये त्यांची निवड झाली आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी अंतिम फेरी होणार असून त्यामध्ये त्या विजयी ठरल्यास मिस इंडियाच्या राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड होणार आहे.
रती हुलजी या मूळच्या सरस्वतीनगर (गणेशपूर) येथील असून कामानिमित्त त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे आहे. त्यांनी बॅचलर ऑफ मासमीडियाचे शिक्षण घेतले आहे. मॉडेलिंगची आवड असल्याने कॉलेजपासून ती आवड त्यांनी जोपासली आहे. मागील 2 वर्षांपासून पूर्णवेळ मॉडेलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सध्या त्या विविध उत्पादनांसाठी
मॉडेल म्हणून आपले करिअर करीत आहेत.
जन्म बेळगावचा असल्याने मिस इंडियासाठी त्यांना कर्नाटकातून सहभागी व्हावे लागले. मॉडेलिंग व अंगीभूत गुणांमुळे अंतिम फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. अंतिम 5 स्पर्धकांमध्ये त्यांची निवड झाली आहे.
यापूर्वी त्यांनी मॉडेलिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले आहे. यावेळी विजेती ठरल्यास मिस इंडियाच्या मंचावर बेळगावची कन्या पाहायला मिळणार
आहे.









