वार्ताहर / खंडेराजूरी
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तपासणी स्वॅब देऊन अहवाल येण्याची प्रतिक्षा असताना बेळंकी (ता. मिरज) येथे एका महिलेने चक्क घुरगुती कार्यक्रमात जेवणाची पंगत वाढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने पंगतीत जेवलेल्या पाहूण्यांची धाबे दणाणली आहेत. आत्तापर्यंत सहा जणांना संस्था क्वारंटाईन केले असून, पंगतीत जेवलेल्यांचा शोध सुरू आहे.
मिरज पूर्व भागात मालगाव, सोनी, शिंदेवाडी, व्यंकोचीवाडी, पाठोपाठ बेळंकी येथेही रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बेळंकी येथील रस्त्यालगत असणाऱ्या वस्तीवर 6 दिवसांपूर्वी मुंबई येथून त्यांचे नातलग आले होते. काल त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी तातडीने आरोग्य केंद्राची संपर्क साधला. घरातील चार जणांचे घशातील स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरूवारी दुपारी तिघांचे अहवाल घेण्यात आले होते.
मुंबईहून आल्यानंतर त्यातील दोघा जणांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. याच कुटुंबात घरगुती जेवणावळीचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातीलच सुमारे शंभर ते दीडशेजण सहभागी झाले होते. तरीही या घरात क्वारंटाईन केलेली महिला या कार्यक्रमात जेवण वाढताना आढळून आली. दुपारी त्या कार्यक्रमात मदत करून, सर्वांची खुशाली विचारून ती महिला दुपारी घरी आली. दुर्वैवाने त्यानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.
सदर महिलेला कोरोना झाल्याचे समजताच जेवणावळीसाठी उपस्थित असणाऱ्या अनेकांची धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत सहा जणांना संस्था क्वारंटाईन केले असून, पंगतीत जेवलेल्या पाहुण्यांचा शोध सुरू आहे.
Previous Articleसोलापूर शहरात आज ८४ पॉझिटीव्ह तर ५ मृत्यू
Next Article कराडमध्ये नगरपालिकेतर्फे शववाहिकेची सोय








