सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश
आत्महत्या करण्यापूर्वी दोन चिठ्ठ्यांमध्ये लिहिली होती 14 जणांची नावे
प्रतिनिधी / मिरज
संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या मिरज तालुक्यातील बेळंकी येथील निवृत्त पोलीस हवालदार कुटुंबाच्या आत्महत्ये प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात 14 जणांवर सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अण्णासाहेब गवाणे यांच्यासह त्यांचा मुलगा महेश आणि पत्नी मालती गवाणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन वेगवेगळ्या सुसाईड नोट लिहून ठेवल्या होत्या. यामध्ये 14 जणांचे 84 लाख रुपये देणेबाकी असून, पैशासाठी त्यांनी तगादा लावला असल्याने आम्ही गव्हाणे कुटुंबीय आत्महत्या करीत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. सदर चिट्ठीमध्ये सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विवेक घाटगे, किरण होसकोट, राजीव शिंगे, (तिघे रा. रायबाग, जि. बेळगाव), विनायक बागेवाडी, संतोष मंगसुळी, (दोघे रा. हरुगिरी, जि. बेळगाव), अमित कुमार कांबळे, प्रवीण बनसोडे, पूजा शिंगाडे, शैलेंद्र शिंदे (चौघे रा.मिरज), बाळासाहेब माळी (रा. कवठेमहांकाळ), कमलेश कलमाडी (रा. नरवाड), अरुण थोरात, जितेंद्र पाटील (दोघे रा. सांगली), आणि जुबेर मोकाशी (रा. कुरुंदवाड, जि. कोल्हापूर) अशा 14 जणांची नावे आहेत.
मिरज ग्रामीण पोलिसांनी सदर 14 जणांवर खासगी सावकारी अधिनियम आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चिट्ठीत नमूद असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.








