वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर-डिसेंबर 2019 च्या चार महिन्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर उच्चशिक्षण घेतलेल्या लोकांमधील बेरोजगारीचे प्रमाण 60 टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (सीएमआयई) केला आहे.
तरुण पदवीधरांसाठी मागील वर्ष अत्यंत खराब राहिल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. सीएमआयई ही एक खासगी थिंकटँक असून त्याची सर्वेक्षणे आणि आकडेवारी अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. मे-ऑगस्ट 2017 नंतर सलग सातव्यांदा बेरोजगारी दर वाढला आहे. मे-ऑगस्ट 2017 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 3.8 टक्के होते असे म्हटले गेले आहे.
शहरांमध्ये समस्या उग्र
सर्वेक्षणानुसार ग्रामीण भारताच्या तुलनेत शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर 9 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शहरांमधील बेरोजगारी राष्ट्रीय सरासरीपेक्षाही अधिक आहे. ग्रामीण भारतात या कालावधीत बेरोजगारी दर 6.8 टक्के राहिला आहे.
अहवालातील अन्य बाबी
ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर कमी असून याचा देशाच्या समग्र बेरोजगारीवर मोठा प्रभाव आहे. पण गावांमधील रोजगाराची पातळी अत्यंत खराब आहे. शहरांमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाईत बेरोजगारी अधिक आहे. 20 ते 24 वर्ष वयोगटातील तरुणाईत बेरोजगारीचा दर 37 टक्के असून यातील पदवीधर बेरोजगारीचा दर 60 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा सरासरी दर 2019 मध्ये 63.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.









