गुजरातमध्येही प्रमाण कमी : सीएमआयईकडून आकडेवारी प्रसिद्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेरोजगारी दरप्रकरणी आता दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. अर्थव्यवस्था हळूहळू पूर्ववत म्हणजेच सुरळीत होण्याच्या दिशेने परतण्यासह देशातील बेरोजगारीचा दर घटत आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) आकडेवारीद्वारे ही माहिती प्राप्त झाली आहे.
सीएमआयईच्या मासिक आकडेवारीनुसार देशात बेरोजगारीचा दर फेब्रुवारीत 8.10 टक्के होता, मार्च महिन्यात हे प्रमाण कमी होत 7.6 टक्क्यांवर आले आहे. 2 एप्रिल रोजी हा दर आणखीन कमी होत 7.5 टक्के राहिला आहे. शहरी बेरोजगारी दर 8.5 टक्के आणि ग्रामीण क्षेत्रांसाठी हा दर 7.1 टक्के राहिला.
बेरोजगारी दर घटत असला तरीही भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टिकोनातून हा दर अद्याप अधिक मानावा असाच आहे. बेरोजगारी दरातील घसरणीमुळे कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था रुळावर परत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे इंडियन स्टॅस्टिकल इन्स्टिटय़ूटचे माजी अर्थतज्ञ अभिरुप सरकार यांनी म्हटले आहे.
हरियाणात सर्वाधिक दर
आकडेवारीनुसार मार्च महिन्यात हरियाणामध्ये बेरोजगारी दर सर्वात अधिक 26.7 टक्के राहिला. त्यानंतर राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी 25 टक्के होता. बिहारमध्ये बेरोजगारी दर 14.4 टक्के, त्रिपुरामध्ये 14.1 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 5.6 टक्के राहिला आहे.
कर्नाटक, गुजरातमध्ये सर्वात कमी
एप्रिल 2021 मध्ये एकूण बेरोजगारी दर 7.97 टक्के होता. मागील वर्षी मे महिन्यात हा आकडा 11.84 टक्क्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. मार्च 2022 मध्ये कर्नाटक आणि गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर सर्वात कमी प्रत्येकी 1.8 टक्के राहिला आहे.









