प्रतिनिधी / सातारा :
सातारा तालुक्यातील बेबलेवाडी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन दिवसांपासून दहशत माजवली आहे. गावातल्या 5 जणांना चावा घेवून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. कुत्र्यांच्या चाव्यामध्ये वृद्ध दांपत्यही गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्रे पिसाळल्याने गावात भितीचे वातावरण आहे.
बेबलेवाडी हे सातारा तालुक्यातील छोटेसे गाव आहे. बहुतांशी ग्रामस्थ हे सकाळपासून आपल्या कामात व्यस्त असतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गावामध्ये भटके कुत्रे पिसाळल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. दोन दिवसांपूर्वी तीन जणांना हे कुत्रे चावले. त्यामध्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाळासाहेब नारायण मोरे (वय 57) हे कामानिमित्त जात असताना त्यांचा चावा त्याच कुत्र्याने घेतला. तसेच मारुती मोरे, समाधान घोरपडे यांनाही चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर आणखी तीन जणांकडे मोर्चा वळवला. सुदैवाने त्यांचे थोडक्यात निभावले. शनिवारी सकाळी जयमाला अंकुश घाडगे (वय 60) घराबाहेर कामानिमित्त घराबाहेर आल्या असताना त्याच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांचा पायाला चावा घेतला. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांना वाचवण्याच्या हेतूने त्याचे पती अंकुश श्रावण घाडगे (वय 65) हे बाहेर आले. त्यांनी त्या कुत्र्यास हटकण्याचा प्रयत्न केला असता त्या कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला करत चावा घेतला. त्यांच्या डोक्यासह शरीराचे चावे घेवून रक्तबंबाळ केले. गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याला पहाटे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी वाइल्ड केअर सेंटरला पाचारण करण्यात आले असून त्यांच्या वतीने पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू आहे. संबंधित विभागाने या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.









