प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कुडाळ तालुक्मयातील पावशी गाव. 26 जानेवारी 2021. वेळ रात्री 10.30 ची. पोलिसांना एक फिरस्त महिला आढळली. चौकशी केल्यावर समजले की त्या महिलेला स्वतःची माहितीही व्यवस्थित सांगता येत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क साधला. या महिलेचे सखी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी सदर महिला असंबद्ध बोलू लागली. तिला वैद्यकीय उपचारांची आवश्यकता होती. त्यामुळे कुडाळ पोलिसांच्या मदतीने सदर महिलेस शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तसेच तिने दिलेल्या त्रोटक माहितीच्या आधारे ती गोवा राज्यातील बिचोली येथील असल्याचा शोध घेतला. बिचोली (गोवा) येथील पोलीस स्थानकामध्ये सदर महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याचे समजले.
सर्व बाबींची खातरजमा करून व महिलेची ओळख पटवून 30 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 4 वाजता कुडाळ पोलिसांच्या मदतीने सखी वन स्टॉप सेंटरने सदर महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आणि ताटातूट झालेल्या या नात्यांची पुन्हा भेट घडली.
या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, विधी सल्लागार तथा प्र. संरक्षण अधिकारी श्रीमती नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही करण्यात आली. तसेच गृह विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती गावडे आणि त्यांचे सहकारी, कुडाळ व सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे व शासकीय रुग्णालय, ओरोस यांचे सहाय्य लाभल्याची माहिती जिल्हा महिला, बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी दिली.









