डॉक्टरनी जाहिरातीच्या माध्यमातून केले आवाहन , हरवलेल्या पोपटासाठी पत्नीने केले खाणे-पिणे बंद
राजस्थानमधील सीकर शहरात पक्षीप्रेमाचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. शहरातील ज्येष्ठ हृदय शल्यचिकित्सक डॉ. व्ही. के. जैन यांनी पाळलेल्या पक्षांपैकी एक पोपट बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने खाणे-पिणे बंद केले. कुटुंबीय आणि रुग्णालयातील कर्मचारी रात्रंदिवस पोपटाचा शोध घेत आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेले नाही. पोपट शोधण्यासाठी डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च केले. वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर मिसिंगची जाहिरात छापून आली. शहरात पोस्टर-पॅम्प्लेट वाटले, सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केले. एवढेच नाही तर पोपट शोधणाऱयाला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. ‘कोणी पोपट शोधून आम्हांला कळवलं तर त्याला एक लाख रुपये देताना अत्यानंद होईल’ असे आवाहन डॉ. व्ही. के. जैन यांनी जाहिरातीच्या माध्यमातून केले आहे.
हजारहून अधिक शब्द बोलणारा दुर्मिळ पोपट
डॉ. जैन यांनी दोन वर्षांपूर्वी आफ्रिकन राखाडी रंगाच्या दोन पोपटांची 80 हजार रुपयांना खरेदी केली होती. कोको असे पोपटाचे नाव ठेवले होते. दोन वर्षांत कोको घरातील सदस्य झाला होता. पोपट हा दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे असून तो हजाराहून अधिक शब्द बोलायचा. त्याच्या अचानक जाण्याने मुलगा, सून आणि मुलगी दुःखी झाली आहे. बायको फक्त रडत त्याच्या येण्याची वाट बघत असल्यो डॉ. जैन यांनी सांगितले.
कोको कुटुंबात इतका मिसळून गेला होता की जेव्हा जेव्हा घरातील सदस्य जेवायचे तेव्हा तोही त्यांच्यासोबत बसायचा. त्यांना सिरिंजने रस आणि दूध पाजण्यात येत असे. डॉ. जैन यांना पशू-पक्ष्यांची विशेष ओढ आहे. त्यांनी आपल्या फार्महाऊसवरही बदक, पोपट, कबुतर, ससा, मांजर, कुत्रा, घोडा यांसह अनेक प्राणी-पक्षी पाळले आहेत.









