रशियाच्या सैन्यावर हत्येचा आरोप
राजधानी कीव्हनजीकच्या युद्धक्षेत्रात बेपत्ता झालेले युक्रेनचे एक प्रमुख पत्रकार मॅक्स लेविन यांचा मृतदेह आढळून आला आहे. मॅक्स लेविन यांना रशियाच्या सैन्याकडून गोळय़ा घालण्यात आल्याचे युक्रेनच्या प्रोसेक्यूटर जनरलच्या कार्यालयाने म्हटले आहे.
लेविन यांचा मृतदेह हुता मेझीहिरस्का गावात आढळून आला होता. लेविन यांनी अनेक युक्रेनियन आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठी काम केले होते. लेविन हे 13 मार्चपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
1 एप्रिल रोजी मिळालेल्या त्यांच्या मृतदेहावर गोळय़ा लागल्याच्या दोन खुणा आढळून आल्या आहेत. लेविन यांच्याकडे कुठलेच शस्त्र नव्हते, तसेच त्यांनी प्रेस जॅकेट परिधान केलेले होते. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत 6 पत्रकार मारले गेले आहेत. लेविन यांच्यामागे कुटुंबात त्यांची पत्नी आणि चार मुले असल्याची माहिती रिपोर्ट्स विदआउट बॉर्डर्स या संस्थेने दिली आहे.









