लग्नाच्या वाढदिवशीच पतीला शुभेच्छा देऊन झाली होती बेपत्ता : पती मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक
वार्ताहर / मालवण:
पतीला मोबाईलवर लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून रॉकगार्डन येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सौ. काव्या कृष्णा माजिक (21) या विवाहितेचा मृतदेह रॉकगार्डनच्या समुद्र किनारी असलेल्या खडकाळ भागात रविवारी सकाळी आढळून आला. मृतदेह खडकाळ भागात तसेच छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने तो बाहेर काढताना आपत्कालीन ग्रुपला अडचणी येत होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे.
मालवण ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवक म्हणून सेवेत असलेल्या कृष्णा माजिक यांची पत्नी काव्या कृष्णा माजिक (21, रा. दोडामार्ग) ही 8 एप्रिल रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास बेपत्ता झाल्या होत्या. 8 रोजी कृष्णा यांनी काव्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिचा मोबाईल लागला नव्हता. नंतर काव्याने कृष्णा यांना ‘हॅपी ऍनिव्हर्सरी’-‘रॉकगार्डन’ अशा आशयाचा मेसेज पाठविला होता. त्यामुळे कृष्णा यांनी तात्काळ रॉकगार्डन परिसरात धाव घेतली होती. त्यावेळी पोलिसांच्या मदतीने रॉकगार्डन परिसरात शोधाशोध केली असता, खडकाळ भागात काव्याची पर्स, मोबाईल, ओढणी, एक चप्पल आढळून आली होती. परंतु त्यावेळी काव्या आजूबाजूच्या परिसरात सापडल्या नव्हत्या.
चार दिवसांनी मृतदेह सापडला
8 एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या काव्या माजिक हिचा मृतदेह रविवारी रॉकगार्डन येथील समुद्राच्या खडकाळ भागात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. दामोदर तोडणकर यांच्या आपत्कालीन ग्रुपचे स्कुबा डायव्हर्स मृतदेह खडकाळ भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. सायंकाळपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले नव्हते. पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.









