विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी, दुसरा दिवस : यजमान इंग्लंड चहापानापर्यंत 5 बाद 378
मँचेस्टर / वृत्तसंस्था
बेन स्टोक्स (349 चेंडूत नाबाद 172) व डॉम सिबली (372 चेंडूत 120) यांच्या तडफदार शतकी मास्टरस्ट्रोकच्या बळावर यजमान इंग्लंडने विंडीजविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी चहापानाअखेर 5 बाद 378 धावांपर्यंत दमदार मजल मारली. अष्टपैलू स्टोक्स व सिबलीची 260 धावांची संयमी, आक्रमक भागीदारी, हे दुसऱया दिवसाच्या खेळाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. चहापानावेळी स्टोक्ससह जोस बटलर (28 चेंडूत 12) नाबाद राहिला.
3 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत विंडीजने एजिस बॉलमधील पहिली कसोटी जिंकत अक्षरशः खळबळ उडवून दिली होती. पण, ओल्ड ट्रफोर्डवरील या दुसऱया कसोटी सामन्यात मात्र विंडीजचा तो विजय हा फ्ल्यूक होता की काय, असे चित्र पहिल्या दोन दिवसात निर्माण झाले आहे. येथे विंडीजचे गोलंदाज अगदीच निष्प्रभ ठरत आले आहेत. इंग्लंडने पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यावर वेसण घातली असल्याचे दिसून आले आहे.
शुक्रवारी, सामन्याच्या दुसऱया दिवशी इंग्लंडने 3 बाद 207 या मागील धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली आणि स्टोक्स-सिबली या फलंदाजांनी अव्वल शतके झळकावत विंडीज गोलंदाजांच्या मर्यादा आणखी स्पष्ट केल्या. जेथे पंचांचे निर्णय रुचले नाहीत, तेथे विंडीजने डीआरएस घेतले. पण, त्यातूनही त्यांना काहीच साध्य झाले नाही. उलटपक्षी, डीआरएस निष्फळ घालवण्यात त्याची परिणती झाली. अंतिमतः डावातील 125 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिबलीचा उत्तूंग फटका मारण्याचा प्रयत्न सपशेल फसला आणि रोशने उत्तम झेल टिपल्यानंतर ही जोडी फुटली. पुढे, दुसऱया सत्रातील खेळात ऑलि पोपही (7) लवकर बाद झाला होता. रोस्टन चेसने चहापानाअखेर 106 धावात 4 बळी घेतले होते.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 139 षटकात 5-378 (बेन स्टोक्स 349 चेंडूत 17 चौकारांसह खेळत आहे 172, डॉम सिबली 372 चेंडूत 5 चौकारांसह 120, जोस बटलर 28 चेंडूत खेळत आहे 12, जो रुट 49 चेंडूत 23, पोप 7, क्रॉली 0, रोरी बर्न्स 15. अवांतर 29. रोस्टन चेस 32 षटकात 106 धावात 4 बळी, अल्झारी जोसेफ 23.1 षटकात 1-70).









