वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यातील बेणापूर येथील डोंगर परिसरातील गवळी शेतात बैल, म्हैस व शेळया चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर तीन लांडग्यांच्या टोळीने हल्ला केला. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून सोडवण्यासाठी गेलेल्या एकावरही लांडग्यांच्या टोळीने हल्ला करून जखमी केले आहे. जयकर भगवान शिंदे( वय ५७) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लांडग्यांच्या हल्ल्याने खानापूर घाटमाथ्यावरील डोंगराळ भागात जनावरे चरवणारे शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत.
याबाबत बेणापूर येथील प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी, बेणापूर येथील अनेक शेतकरी दररोज कुरण आणि डोंगर परिसरात जनावरे चरविण्यासाठी जातात. या परिसरात लांडग्यांची मोठी संख्या असून हे लांडगे शेळ्यांच्या कळपावर हल्ला करत होते. मात्र त्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची पहिलीच घटना घडली आहे. डोंगर परिसरातील गवळी शेतात जनावरे चरविण्यासाठी गेलेल्या जयकर शिंदे यांच्यावर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तीन लांडग्यांनी अचानक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने जयकर शिंदे घाबरले मात्र त्यांच्या जवळ असलेल्या कुऱ्हाडीने त्या लांडग्यांवर प्रतिहल्ला केला. तरीही लांडग्यांनी जयकर शिंदे यांच्या हाताचे व पायाचे लचके तोडून गंभीर जखमी केले. यावेळी जयकर शिंदे यांना वाचविण्यासाठी गेलेल्या बिटू जालिंदर शिंदे यांच्यावरही लांडग्यांनी हल्ला केला यात बिटू शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती बेणापूर गावात मिळाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी लांडग्यांना हुसकून लावले.
या हल्ल्याची माहिती खानापूर वन विभागास देण्यात आली असून लवकरच पंचनामा करून या लांडग्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. तसेच या जखमी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल अशोक चव्हाण यांनी दिली. या घटनेने शेतकरी भयभीत झाले असून लांडग्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी बेणापूर, बलवडी(खा) परिसरातून होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








