मेरी कोम ही भारताची स्टार बॉक्सर. मेरीने टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीचा अडथळा पार केला आहे. यामुळे मेरी खूप खूश आहे. मध्यंतरी अनेकांनी तिच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. मात्र तिने आपल्या कामगिरीने सर्वांना गप्प केलं. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर मेरी व्यक्त होते. ती म्हणते, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता मी स्वतःला सिद्ध केलं आहे. माझ्या खांद्यांवरचं मोठं ओझं उतरलं आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यामुळे लोकांचं माझ्याबद्दलचं मत बदलेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बरेच लोक खेळात राजकारण आणतात. पण क्रीडाक्षेत्रात कामगिरीला महत्त्व आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं.
मेरी सांगते, बॉक्सिंग रिंगच्या बाहेरच्या वक्तव्यांच्या फक्त बातम्या होतात. त्यांना काहीच अर्थ नसतो. ही वक्तव्यं नेहमीच विस्मरणात जातात. सरतेशेवटी बॉक्सिंग रिंगमधली कामगिरीच महत्त्वाची ठरते. बाहेर कितीही बाता मारल्या आणि बॉक्सिंगच्या रिंगणात अपेक्षित कामगिरी झाली नाही तर या बडबडीला काहीच अर्थ नसतो. त्यामुळे मी सुद्धा कामगिरीवर भर देते. तोंडापेक्षा माझा पंच बोलला तर अधिक चांगलं. विस्मृतीत जाणार्या वक्तव्यांपेक्षा अविस्मरणीय कामगिरी करून दाखवणं खूप चांगलं आहे, असंच मी म्हणेन.
मेरी सांगते, आजवर मी कोणाचंही वाईट चिंतलं नाही. कोणाचं वाईट केलं नाही. खेळाडू वरिष्ठ असो वा कनिष्ठ, मी सगळ्यांचा आदर करते. सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागते. त्यामुळे लोकांनीही माझ्याशी याच पद्धतीने वागायला हवं. माझाही आदर करायला हवा. माझ्याशी चांगलं वागा. मी तुमच्याशी चांगलं वागेन. बस्स… यापेक्षा आयुष्यात अजून काय हवं असतं?









