जगात अनेक अजब ठिकाणं आहेत, ज्याबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही किंवा जुजबी माहिती आहे. परंतु अशा ठिकाणांबद्दल कळल्यावर चकित व्हायला होते. एका बेटावर राहणाऱया 10 टक्के लोकसंख्येला रंगच दिसत नाहीत. या लोकांना सर्वकाही ब्लॅक अँड व्हाइट दिसते.
प्रशांत महासागरातील पिंगेलॅप बेटावर हा अजब प्रकार आढळून येतो. या ठिकाणाला कलर ब्लाइंडनेस आयलँड देखील म्हटले जाते. 1975 मध्ये येथे एक विध्वंसक वादळ धडकले होते, ज्यात येथे राहणारे बहुतांश लोक वाहून गेले होते. केवळ 20 लोकांचा जीव वाचू शकला होता. तर दुसरीकडे येथील लोक एका दुर्लभ आनुवांशिक आजाराला तोंड देत आहेत. या भागातील एक हिस्सा रंगांधळेपणाने ग्रस्त आहे. म्हणजेच येथील लोकांना रंगच दिसून येत नाहीत.

हा आजार एका पिढीतून दुसऱया पिढीतील लोकांपर्यंत पोहोचत आहे. आजही येथील सुमारे 10 टक्के लोकसंख्येत हे गुणसूत्र आढळून येते. वैद्यकीय भाषेत याला अक्रोमॅटोप्सिया म्हटले जाते. जगात 30 हजार लोकांमागे एका व्यक्तीला अशाप्रकारची समस्या असते. परंतु या बेटावर एकाच ठिकाणी मोठय़ा संख्येत लोक या आजाराने ग्रस्त आहेत. लाल किंवा निळय़ा रंगात होत असलेला बदल काही प्रमाणात जाणवत असल्याचा दावा येथील काही लोक करतात. परंतु हे रंग अद्याप पूर्णपणे दिसून येत नाहीत. येथील सुमारे 8 टक्के पुरुष आणि एक टक्के महिलांमध्ये ही समस्या आहे. त्यांना केवळ ब्लॅक अँड व्हाइटच दिसून येते.
काही वर्षांपूर्वी बेल्जियमच्या एका छायाचित्रकाराने या लोकांदरम्यान जात वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सादर केलेल्या छायाचित्रांमधील रंग बहुतांश लोकांना ओळखता आले नाहीत. अक्रोमॅटोप्सियाने पीडित लोक प्रकाशाबद्दल अत्यंत संवेदनशील असतात. अमेरिकन जर्नल ऑफ ह्युमन जेनेटिक्समध्ये प्रकाशित संशोधनानुसार हे गुणसूत्र वादळापूर्वी देखील येथील लोकांमध्ये होते, असे आढळून आले आहे. तसेच या विकारामागे नैसर्गिक कारण असू शकते.









