रात्रीच्यावेळी शेतीकडे जाणे मुश्कील झाल्याने भीती
प्रतिनिधी / बेळगाव
पश्चिम भागात रब्बी हंगामात बटाटा व भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र, हेस्कॉमकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बेकिनकेरे, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड भागातील शेतकऱयांची शेती डेंगराच्या पायथ्याशी आहे. या शिवारात रब्बी हंगामासाठी पिकांची लागवड केली आहे. मात्र, रात्रीच्यावेळी वन्य प्राणी पिके फस्त करत आहेत. त्यासाठी रात्रीच्यावेळी शिवारातील सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.
उचगाव उपकेंद्रातून कोनेवाडी, बसुर्ते, उचगाव, तुरमुरी, बाची, अतिवाड, बेकिनकेरे गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, सध्या थ्री फेजचा वीजपुरवठा सुरळीत असला तरी रात्री शिवारातील सिंगल फेज वीजपुरवठा अघोषितपणे खंडित केला जातो त्यामुळे रात्री शिवारात रखवालीसाठी अंधारात फिरावे लागते.
रात्री शेतकऱयांना धोका
वन्यप्राणी रात्री अंधारात पिकात धुडगूस घालून नासाडी करत आहेत. यासाठी रात्री शिवारात सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात मका, ज्वारी, बाजरी, बिन्स, ऊस, मिरची व बटाटय़ांची लागवड केली आहे. मात्र, रात्री डोंगर भागातून गवे व रानडुकरांचे कळप पिकात हैदोस घालत आहेत. त्यामुळे नुकसान होत आहे. विशेषकरून रात्रीच्या वेळीच वन्यप्राण्यांचा शिवारात संचार वाढला आहे. त्यामुळे शेताकडे जाणे शेतकऱयांसाठी धोक्मयाचे बनले आहे.
तरी धोका टाळण्यासाठी रात्री शिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









