नवीन पाईप घालण्याचे काम संथगतीने : गैरसोयीमुळे काम तातडीने करण्याची मागणी

वार्ताहर /उचगाव
बेकिनकेरे येथे शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेसाठी नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गावामध्ये जुनी नळपाणी योजना कार्यान्वित आहे. मात्र जादा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन घालण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. काम सुरू असताना जुन्या पाईपचे नुकसान झाले तर ते सदर ठेकेदाराने दुरूस्त करून देणे असे ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले होते. मात्र सध्या गावामध्ये अनेक ठिकाणी काम सुरू असताना जुन्या पाईपलाईन फुटल्याने त्याचे पाणी वाया जात आहे.
साहजिकच नळांना पाणी कमी प्रमाणात आणि दूषित येत आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी सदर ठेकेदाराकडे फुटलेले पाईप दुरूस्त करण्याची मागणी केली. मात्र सदर ठेकेदार फुटलेले पाईप दुरूस्त करणार नसल्याचे सांगत असल्याने नागरिकांची पाण्याशिवाय गैरसोय होत आहे.
यासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा, उपाध्यक्ष, सदस्य यांनी सदर ठेकेदाराला समज देऊन त्यांनी फोडलेल्या पाईप दुरूस्त करून द्याव्यात, सुरू असलेले काम जलद करून नवीन योजना तातडीने पूर्ण करावी तसेच नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा लवकरात लवकर करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.









