दोडामार्गातील युवकांनी व्यक्त केली खंत
वार्ताहर / दोडामार्ग:
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण देशभरात हाहाकार माजलेला आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका, गाव काही विशिष्ट सवलती सोडता लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. दोडामार्ग तालुका व गोवा राज्य यांचे घनिष्ठ संबंध आहेत. परंतु 22 मार्च 2020 पासून गोवा व महाराष्ट्र राज्य यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा गोव्याशी असलेला संपर्क तुटलेला आहे. गेले तीन महिने गोव्यात कामानिमित्त जाणारे दोडामार्ग तालुक्यातील कितीतरी युवक-युवती आज घरीच बसून आहेत. सीमा बंदीमुळे त्यांना गोवा राज्यात प्रवेश मिळणे कठीण होऊन बसले आहे. गोव्यातील कंपन्यानमधून कामावरून हजर न झाल्यास कामावरून कमी करण्याचा इशारा देण्यात येत आहे. कितीतरी युवकांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बेकारीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत आजचा युवक वाईट मार्गाला प्रवृत्त होऊ शकतो, अशी भीती भेडशी येथील युवक प्रतिनिधी विष्णू वासुदेव मुंज यांनी व्यक्त केली. शासनाने याबाबत गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत कैफियत मांडताना मुंज पुढे म्हणाले, गोवा सरकारच्या नियमानुसार कोरोना टेस्ट, पेड क्वारंटाइन वगैरे प्रक्रिया करायची व गोवा राज्यात प्रवेश मिळवायचा. पण, गेले तीन महिने बिनपगारी घरी असलेल्या युवकांनी या प्रक्रियेसाठी पैसे आणायचे कुठून?, 14 दिवस विलगीकरणाचा खर्च करणे त्यांना कसे शक्य आहे? ज्यांना कामावरून कमी करण्यात आले, त्यांनी घर खर्च कसा चालवायचा? शासनाने या सर्व युवकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केल पाहिजे. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.









