कळंगूटवासीयांनी पोलीस महासंचालकांसमोर मांडल्या व्यथा
प्रतिनिधी/ पणजी
बार्देश तालुक्यातील किनारी भागात खासकरून कळंगुट येथे सुमारे 12 ते 13 डान्स बार बेकायदेशीररित्या सुरू आहेत. यासाठी सुमारे 250 दलाल कार्यरत असून या सर्वांना रोखून कळंगूटमध्ये स्थानिकांना होणारा मनस्ताप दूर करावा, अशी मागणी कळंगुट मतदारसंघाचे आमदार मायकल लोबो व कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केली आहे.
लोबो, सिक्वेरा व कळंगुट येथील नागरिकांनी काल बुधवारी पणजी पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. कळंगुटमध्ये बेकायदेशीर व्यवसाय सुरू असतानाही पोलिसांकडून कारवाई करण्यास हलगर्जीपणा होत असल्याचे लोबो यांनी महासंचालक सिंग यांना सांगितले.
बेकायदेशीरपणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष
रात्री दहानंतर पाटर्य़ा व रेस्टॉरंट सुरू असतानाही पोलीस बघ्याची भूमिका घेतात आणि यातूनच बेकायदेशीर व्यवसाय वाढत आहे. पंचायतीकडून कारवाईचा प्रयत्न अनेकदा होऊनही पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच बेकायदेशीर व्यावसायिकांचे फावत असल्याचा आरोप लोबो यांनी केला.
दलालांवर कारवाई व्हायलाच हवी
पंचायतीने कारवाई केल्यानंतर डान्स बार बंद आहेत. मात्र, काही ठिकाणी ग्राहकांना किंबहुना पर्यटकांना वाटेत गाठून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून त्यांची फसवणूक करणारे दलाल आहेत. फसवणूक झालेले पर्यटक या दलालांकडे आपले घेतलेले पैसे मागितल्यास त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे या दलालांवर कारवाई व्हायलाच हवी, असे लोबो म्हणाले.
दलालांमुळे गोव्याची बदनामी
सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून कळंगुटमध्ये दलालांचा त्रास होत आहे. हे दलाल लोक गोव्यातील नसून, ते इतर राज्यातील आहेत. पर्यटकांना त्यांच्याकडून अनेकदा फसवणूक झालेली आहे आणि होत आहे. अशा दलालांमुळेच गोव्याचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे या दलालांवर कारवाई व्हावी, यासाठीच आम्ही ग्रामस्थांसमवेत पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांना भेटलो असल्याचे ते म्हणाले. महासंचालक सिंग यांनी भरारी पथके नेमण्याचे आश्वासन दिले असल्याचेही ते म्हणाले.
कारणे दाखवा नोटीस बजावणार
कळंगुट क्षेत्रात अंदाजे 10 ते 12 बेकायदेशीर रेस्टॉरंट सुरू आहेत. पंचायतीचा परवाना मुदत संपूनही ते चालविले जात असल्याने अशा व्यावसायिकाना आता पंचायतीकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली.









