महसूल विभागाची देवली येथे कारवाई
अन्य एक डंपर पळून जाण्यात यशस्वी
परप्रांतीय कामगारांकडून वाळू उत्खनन
प्रतिनिधी / मालवण:
बुधवारी रात्री देवली येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने महसूलच्या पथकाने धडक कारवाई करत मालवण-देवली रस्त्यावर वाळू भरलेला डंपर पकडला. तर दुसरा डंपर आडमार्गाने पळून जाण्यात यशस्वी झाला. हा डंपर कुडाळ येथील व्यावसायिकाचा असून त्याला नोटीस बजावल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर, तलाठी ठाकुर, शिंगरे आणि कोतवाल शिंदे यांच्या पथकाने केली. पकडण्यात आलेल्या डंपरवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे देवली येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याचे पुढे आले आहे.
दुसरा डंपर पळाला
मंडळ अधिकारी निपाणीकर बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोहोचले असता, त्यांनी आपली कार एका डंपर समोर उभी करून त्या डंपर मालकाकडे चौकशी सुरू केली असता, त्याच्या पाठीमागून येणारा दुसरा डंपर आडमार्गाने पळण्यात यशस्वी झाला. तलाठय़ाने दुचाकीने पाठलाग करून तो अडविण्याचा प्रयत्न केला मात्र तो डंपर देवली येथून निसटला. संबंधित डंपरची माहिती घेण्याची कार्यवाही सुरू असून त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
खाडीपात्रात मोठय़ा प्रमाणात उत्खनन
महसूल विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, देवली खाडीपात्रात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर वाळू उत्खनन करण्यात येत होते. दहा ते बारा होडय़ा खाडीपात्रात उतरविण्यात आल्या होत्या. कारवाईसाठी महसूलचे पथक येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर होडय़ा पळविण्यात आल्या होत्या. यामुळे देवलीतील बेकायदेशीर वाळू उत्खननाचा प्रकार यानिमित्त दिसून आला आहे.
परप्रांतीय कामगारांवर कारवाई आवश्यक
वाळू लिलाव झालेले नसतानाही मोठय़ा संख्येने गावात असलेल्या परप्रांतीय भैय्या कामगारांवर कारवाई होऊन त्यांना प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. हे कामगार एकत्र राहून रात्रीच्यावेळी वाळू उत्खननासाठी होडय़ा खाडीपात्रात उतरवित असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत महसूल प्रशासनाकडूनही चौकशी सुरू असून संबंधित परप्रांतीय कामगारांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









