उळ्ळागड्डी-खानापूर भागातील नागरिकांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
उळ्ळागड्डी-खानापूर महाराष्ट्र राज्याच्या हद्दीला लागूनच आहे. त्या परिसरात अनेक खडी क्वॉरी आहेत. रात्रीच्या वेळी जिलेटिन स्फोट करणे तसेच खडी मशीन्स सुरू केल्यानंतर त्याचा धुरळा शिवारातील पिकांवर बसून मोठे नुकसान होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप त्या बेकायदेशीर क्वॉरी मशीनवर कारवाई करण्यात आली नाही. तेव्हा तातडीने दखल घेऊन संबंधित क्वॉरी चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी उळ्ळागड्डी-खानापूर येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उळ्ळागड्डी-खानापूर आणि महाराष्ट्रातील हलकर्णी या परिसरात क्वॉरी मशीन्स आहेत. जिलेटिन स्फोट केल्यानंतर मोठे दगड शिवारात येऊन पडत आहेत. त्यामुळे घरांनाही तडे जात आहेत. स्फोटानंतर उडणारा धुरळा शिवारातील पिकांवर पडून पिके नष्ट होत आहेत. कूपनलिकाही खराब होत आहेत. तेव्हा तातडीने कारवाई करा, असे या निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन दिले. यावेळी सुरेश जरळी, अशोक तळवार, प्रकाश खानापुरे, महावीर सुभागोळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.









