शेतकऱयांचा कंत्राटदार आणि अधिकाऱयांना इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
अलारवाड क्रॉसजवळ कामाची परवानगी नसताना बेकायदेशीररित्या ओव्हरब्रिज बांधण्यात येत आहे. हलगा-मच्छे बायपाससाठीच हा ब्रिज उभारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. शुक्रवारी कंत्राटदाराला आणि अधिकाऱयांना शेतकऱयांनी चांगलेच धारेवर धरले. कंत्राटदार आणि अधिकारी शेतकऱयांच्या डोळय़ात धुळ फेकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र शेतकऱयांनी या सर्वांना चांगलेच खडसावले. काम बंद करा अन्यथा कायदा हातात घेवू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकऱयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या रस्त्याच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना राष्ट्रीय महामार्ग शेजारी ओव्हरब्रिजची उभारणी करण्यात येत आहे. याबाबत शेतकऱयांनी हे काम कोणत्या रस्त्याचे चालु आहे असे विचारले. त्यावर अधिकारी एसटीपी पाईप घालण्यासाठी काम सुरु असल्याचे सांगितले. एकूणच शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शेतकरी शुक्रवारी आंदोलन करणार असे समजताच हे काम बंद करण्यात आले. आज काम बंद का, असे विचारले असता बिल मिळाले नाही म्हणून आम्ही काम बंद केल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणे या ब्रिजचे काम सुरु करुन न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे आता शेतकरी उच्च न्यायालयात याबाबत पुन्हा आवाज उठविणार आहेत. कंत्राटदाराकडे या कामाची कोणत्याही प्रकारची वर्क ऑर्डर नाही. शेतकऱयांनी वर्क ऑर्डर दाखवा आणि काम सुरु करा, असा अट्टाहास धरला. त्यामुळे अधिकारी चांगलेचअडचणीत आले.
शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांनी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. हे काम सुरु केले तर पुन्हा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे. यावेळी बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे उपाध्यक्ष राजू मरवे, शहराध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, सचिव भोमेश बिर्जे, रमाकांत बाळेकुंद्री, लक्ष्मण देमजी, अनिल अनगोळकर, नितीन पैलवानाचे, रमेश मऱयाकाचे, तानाजी हलगेकर, सुभाष चौगुले, रितेश होसूरकर, महेश होसूरकर, मोहन मरवे, प्रभाकर अवचारे, गजानन तारिहाळकर, भय्या होसूरकर, नरेश तारिहाळकर, यल्लाप्पा तारिहाळकर, आनंदा खन्नुकर, रघुनाथ सोमनाचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









