मडगाव पालिकेची जुना बाजार परिसरात कारवाई
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने जुना बाजार परिसरात बेकायदा झोपडीवजा गाळे उभारून वास्तव्य करणाऱया परप्रांतीयांच्या विरोधात मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केली आहे. जुना बाजार येथे प्लास्टिक ऑफ पॅरीसच्या मूर्ती तयार करून विकणारे तसेच अन्य बेकायदा व्यवसाय करणारे परप्रांतीय जवळच्या खुल्या जागेत अतिक्रमण करत असतात. कित्येक वेळा कारवाई करूनही ते पुन्हा पुन्हा झोपडीवजा गाळे उभारून वास्तव्य करत असतात व सर्व विधी उघडय़ावर करून परिसर गलिच्छ करत असतात.
त्यांनी येथे पुन्हा बस्तान मांडल्याने स्थानिक नगरसेवक फ्रान्सिस जोनास यांनी नगराध्यक्षांच्या नजरेस ही बाब आणून दिली व नगराध्यक्षांसोबत उपस्थित राहून या बेकायदा वास्तव्य करून असलेल्यांना हाकलून लावले. पालिकेच्या या अतिक्रमणविरोधी कारवाईचे समाजमाध्यमांवरून स्वागत होत असून सदर कारवाई सलग राबविण्यात यावी, अशी मागणी मडगाववासियांकडून होत आहे.
सदर परप्रांतीयांकडून सर्व व्यवहार उघडय़ावर केले जात असल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त होण्याबरोबर सर्वत्र दुर्गंधी पसरत असते अशा तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्याने फेब्रुवारी महिन्यात मडगाव पालिकेने कारवाई करताना काही मूर्ती जप्त केल्या होत्या व या परप्रांतियांना गाशा गुंडाळण्याचा इशारा दिला होता. प्रभाग-1 चे नगरसेवक जोनास यांनीच त्यांच्याकडे वाढत्या तक्रारी आल्याने पालिकेचे मार्केट निरीक्षक व कारवाई पथक घेऊन सदर कारवाई केली होती.
हटविले, तरी हे परप्रांतीय महिना-दोन महिन्यांत परत येऊन बस्तान मांडत असतात. यापूर्वी माडेल येथील कपेलजवळ ते तात्पुरत्या झोपडय़ा उभारून उघडय़ावर सर्व कारभार करत असल्याने त्या परिसरातील रहिवासी आपल्याकडे तक्रार घेऊन आले होते. त्यामुळे पालिका व पोलिसांची मदत घेऊन त्यांना हाकलण्यात आले होते. त्यानंतर कपेलपासून काही अंतरावर त्यांनी बेकायदा बस्तान मांडले होते. जुन्या बाजारात वाहतूक बेटाजवळ सिग्नल पडल्यावर मूर्तींची विक्री करण्याचे वा भीक मागण्याचे प्रकार त्यांच्याकडून चालतात, याकडे जोनास यांनी त्यावेळी लक्ष वेधले होते. यासंदर्भात पालिका व पोलिसांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि रेल्वेत बसवून या परप्रांतियांची त्यांच्या गावी रवानगी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









