बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई, 129 लीटर दारु जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
कारमधून बेकायदा दारु वाहतूक करणाऱ्या हल्ल्याळ तालुक्यातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बहाद्दरवाडी क्रॉसजवळ ही कारवाई केली असून कारसह 129 लीटर गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे.
संतोष महादेव कौंदळकर (वय 33, रा. यडोगा, ता. हल्ल्याळ), महम्मदगौस निसारअहम्मद मनियार (वय 24, रा. महम्मदअली रोड, हल्ल्याळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
एमएच 04 बीझेड 7171 क्रमांकाच्या होंडा सीवीक कारमधून दारु वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बहाद्दरवाडी क्रॉसजवळ पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता 180 एमएलच्या 720 बाटल्या कारमध्ये आढळून आल्या. कारसह जप्त मुद्देमालाची किंमत 1 लाख 18 हजार 720 रुपयांइतकी होते. या दोघा जणांवर कर्नाटक अबकारी कायदा 32 व 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









