प्रतिनिधी/ सांगे
बेंडवाडा-सांगे येथिल बंद असलेल्या पुलाचे काम येत्या वीस दिवसांत सरकारने सुरू न केल्यास आंदोलन करण्याची इशारा सांगे गट काँग्रेस पक्षाने दिला आहे. सांगेच्या विकासाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सांगे येथील पत्रकार कक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष व रिवण जिल्हा पंचायतीचे उमेदवार अभिजित देसाई यांनी केला आहे.
यावेळी सांगे गट काँग्रेस अध्यक्ष जुजेफिना फर्नांडिस, माजी अध्यक्ष डॉ. रेवणसिध्द नाईक, युवा अध्यक्ष सतीश भगत, गोवा प्रदेश सचिव रजनीकांत नाईक, बॉसत्याव सीमोईस, धर्मु (दादी) करमलकर उपस्थितीत होते.
अभिजित देसाई म्हणाले की, बेंडवाडा येथील पर्यायी पुलाची मागणी अनेक वर्षाची असून सरकारने पैसे दिले नाही म्हणून कंत्राटदार काम करीत नाही याला अर्थ नाही. या पुलाच्या बांधकाम साठीच्या प्रस्तावाला आर्थिक मंजूरी घेतलीं जाते, मग निधी का दिला जात नाही असा सवाल श्री.देसाई यांनी उपस्थितीत केला. सांगेतील जनतेने भाजपला भरभरून दिले पण त्याच्या बदल्यात जे द्यायला पाहिजे होते ते मिळत नाही असा आरोप त्यांनी केला. सांगे पुलाचे बंद पडलेले काम त्वरित चालू होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सांगेवासियांसाठी बेंडवाडा येथील पूल गरजेचा असून जुना पूल अरुंद व जुना बनलेला असल्याने सरकारने तातडीने लक्ष देऊन थांबलेले काम चालू करण्याची मागणी सांगे गट काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. रेवणसिद्ध नाईक यांनी केली आहे. सरकार सांगेच्या विकासाकडे दुजाभाव करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
रजनीकांत नाईक म्हणाले की, सरकार सांगेवासियांना गृहीत धरत असून सांगेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पुलाची स्थिती बिकट बनविली आहे. रवींद्र भवनची पाया भरणी होत नाही. क्रीडा कॉम्लेक्सचे तीन-तेरा वाजले आहे. कोणतेही ठोस विकासाचे काम हाती घेतल्याचे दिसत नाही.
पुलाच्या कंत्राटदाराला द्यायला पैसे नाहीत. मात्र उधळपट्टी चालू आहे. काजूच्या आधारभूतची सबसिडी अजून शेतकऱयांना मिळत नाही असे श्री नाईक यांनी सांगितले. सरकारने सांगेच्या विकासात राजकारण आणू नये असे सांगून भाजपची चाल लोकं ओळखून असल्याचे ते म्हणाले.
पुलाचे काम येत्या 20 दिवसात चालू न केल्यास लोकांना घेऊन काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले. सांगेकरच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये असा इशारा देण्यात आला.
बॉसत्याव सीमोइस म्हणाले की, हे सरकार गोड गोड बोलते पण काहीच करत नाही. आमदार प्रसाद गावकर आपल्या परीने विकास कामे करण्यास धडपडत आहेत, पण सरकार पाठिंबा देत नाही हे पुलाच्या कामावरून दिसून येते असे ते म्हणाले.
सरकार एकीकडे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा विकार करण्यावर भर दिल्याचे सांगते. पण, सांगेमधे विकास दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे. साखर कारखाना चालविणे शक्मय आहे पण तेथेही नकारात्मक भूमिका हे योग्य नाही असे श्री सीमोईस यांनी सांगून सरकार पुलाचे काम त्वरित चालू न केल्यास सागेवासीय आक्रमक बनतील असा इशारा दिला.
यावेळी बोलताना धर्मु (दादी) करमळकर यांनी पुलाच्या विषयात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कोणत्याही परिस्थितीत पुलाचे काम लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. सरकारने राजकारण करून हे काम सुरू करण्यास कंत्राटदाराला भाग पाडले नाही असा लोकांचा समज झाल्याचे ते म्हणाले. सांगे भूमीतूम गान तपस्विनी मोगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर, पंडित जयकृष्ण भाटीकरसह अनेक दिग्जज कलाकार दिले असून रवींद्र भवन होत नाही हे दुर्भाग्य असल्याचे श्री. करमलकर म्हणाले.









