सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात विकास कामांच्या अनुषंगाने नुकतीच पालिकेच्या स्थायी समितीची सभा पार पडली. त्या सभेत अजेंडय़ावर सात विषय हे स्टील बेंच पुरवण्याचे होते. प्रभाग 1 ते 15 आणि हद्दवाढीतील शाहुपूरी, विलासपूर आणि खेड या तीन भागात नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी नगराध्यक्षांचा राखीव 15 टक्के फंडातून सुमारे 17 लाख 53 हजार 920 रुपयांचा निधी खर्च होणार आहे. एवढे मोठे काम जर एकाच विषयात घेतले असते तर टेंडर प्रक्रिया राबवणे अवघड झाले असते, याकरता प्रभागनिहाय विभागणीकरुन तीन लाखाच्या आतील विषय बनवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी ठेकेदार ओळखीचा असावा अशी शक्यता नविआकडून नगरसेवक अविनाश कदम यांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्षांच्या राखीव 15 टक्के फंडातून प्रभाग 1 ते 5 मध्ये स्टील बेंच बसवण्याच्या कामासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, प्रभाग 6 ते 10 मध्ये नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच 2 लाख 92 हजार 320 रुपये, प्रभाग 11 ते 15 मध्ये नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच बसवण्याकरता 2 लाख 92 हजार 320 रुपये, दरे खुर्द व मंगळवार पेठ परिसरातील नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, विलासपुर व शाहुपूरी हद्दीतील नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवण्यासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, शाहुपूरी हद्दीत गेंडामाळ हुतात्मा उद्यानात नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवणे यासाठी 2 लाख 92 हजार 320 रुपये, खेड हद्दीत नागरिकांना बसण्यासाठी स्टील बेंच पुरवणे 2 लाख 92 हजार 320 रुपये असा नगराध्यक्षांच्या राखीव 17 लाख 53 हजार 920 रुपयांचा फंड नुसत्या स्टील बेंचवर खर्च होणार आहे.









