बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेडची कमतरता भासत असल्याचे समोर आले आहे. तर काही रुग्णलयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिल्याच्या घटना घडल्या आहेत. बेंगळूर आरोग्य विभागाने मंगळवारी विक्रम हॉस्पिटल आणि जयनगरमधील सागर हॉस्पिटलची पाहणी करत ओपीडी ४८ तासांसाठी सील केली. दोन्ही रुग्णालयांवर सरकारला रुग्णालयातील ५० टक्के बेड्स न देण्याचा आणि सरकारी आरोग्य विभागाकडून पाठवलेल्या कोविड रूग्णांची भरती न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे बेंगळूरमधील विक्रम हॉस्पिटल आणि सागर हॉस्पिटलचे बाह्यरुग्ण विभाग ४८ तासांसाठी सील केले आहे.
बेंगळूर शहरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास जी. ए. यांनी मंगळवारी दोन्ही रुग्णालयांची पाहणी करून ओपीडी सील केली. ते म्हणाले की २ ९ जून रोजी खासगी रुग्णालयांनी सरकारला ५० टक्के बेड देण्याचे आश्वासन दिले होते पण सुवर्णा आरोग्य ट्रस्टने पाठविलेले कोरोना रुग्ण भरती करून घेतले नाहीत. त्यामुळे ओपीडीला सीलबंद केले असून पोलिस बंदोबस्तही तैनात केला आहे. यानंतरही रुग्णालयांनी मनमानी केल्यास पुढेही कारवाई केली जाईल असे म्हंटले आहे.
आरोग्य आयुक्त पंकज कुमार यांनी आश्वासन देऊनही अनेक खासगी रुग्णालये कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत सरकारला पाठिंबा देत नाहीत. तरी इथूनपुढे रुग्णालयांनी सहकार्य न केल्यास साथीचे रोग आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे म्हंटले आहे.
पांडे यांनी १०८ रुग्णवाहिकांमध्ये श्वासोच्छ्वासाच्या रुग्णांना हलविण्याबाबत महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. तसेच, सर्व रूग्णालयांना इशारा देण्यात आला आहे की १०८ रुग्णवाहिकांमधून श्वसनास त्रास झालेल्या रूग्णांना कोविड संशयित मानले जावे आणि त्यांना आइसोलेशन वॉर्डात दाखल करावे. बेंगळूर शहरी क्रमांक, संदर्भ पत्र किंवा कोविड चाचणी अहवालाच्या नावाखाली रुग्णालये उपचार नाकारू शकत नाहीत. कर्नाटक खाजगी वैद्यकीय आस्थापना कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत असे करणार्यांवर कारवाई केली जाईल. सूचनांनुसार कोविड अहवाल येईपर्यंत रुग्णालय सरकारद्वारे संदर्भित रुग्णांवर शासकीय दराने उपचार करेल. अन्यथा कारवाई केली जाईल असे म्हंटले आहे.









