बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर येथे केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) पोलिसांनी अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सीसीबी पोलिसांना ३८ परदेशी अवैध, कालबाह्य कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे आढळले.
सह आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एकूण ६० घरांमध्ये झडती घेण्यात आली. यावेळी “आमच्या पोलिसांना परदेशी रहिवाशांच्या घराची झाडाझडती घेतली त्यावेऴी ९० एक्स्टसी गोळ्या आणि गांजा सापडला”, अशी पुष्टी त्यांनी केली. दरम्यान, सीसीबीने परदेशी कायदा आणि एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, देशात होत असलेल्या अतिरेकी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सीसीबी पोलिसांनी शहरात योग्य कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन तपासणी केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिली आहे. तसेच या कारवाईसाठी तब्बल ६ एसीपी, २० पोलीस निरीक्षक आणि १०० हेड कॉन्स्टेबल, पोलीस हवालदार तैनात करण्यात आले आहेत.









