इतर कंपन्यांनी सेवा बंद केल्याने गैरसोय : फेऱया वाढविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-बेंगळूर या मार्गावर केवळ एकच विमानफेरी उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यापूर्वी चार विमान कंपन्या या मार्गावर सेवा देत होत्या. आता केवळ एकच कंपनी सेवा देत असल्याने प्रवाशांना शेजारील हुबळी विमानतळावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे बेळगाव-बेंगळूर मार्गावरील विमानफेऱयांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
बेंगळूर येथून अनेक उद्योजक, व्यापारी, प्रशासकीय अधिकारी बेळगावला येतात. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला असून सुवर्णविधानसौध असल्याने प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱयांची नेहमीच ये-जात असते. तसेच बेंगळूर हे देशातील महत्त्वाचे शहर असल्याने बेळगावमधील प्रवाशांची संख्या अधिक असते. विमानाचा प्रवास हा जलदगतीने होत असल्यामुळे प्रवासी विमानाला प्राधान्य देतात.
बेळगावमधून बेंगळूरला जाण्यासाठी यापूर्वी चार विमान कंपन्या सेवा देत होत्या. अलायन्स एअर, स्पाईस जेट, इंडिगो व स्टार एअर या कंपन्यांनी फेऱया सुरू ठेवल्या होत्या. परंतु लॉकडाऊनपासून यातील काही फेऱया बंद करण्यात आल्या. अलायन्स एअरने तांत्रिक कारण देत बेंगळूर विमानफेरी रद्द केली. स्पाईस जेटने मध्यंतरी विमानफेरी सुरू ठेवली. परंतु आता बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या असूनही विमाने नसल्याने अडचण होत आहे. इंडिगोच्या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हुबळी विमानतळाला फायदा
बेळगाव-बेंगळूर मार्गावरील विमानफेऱया कमी करण्यात आल्याने याचा फायदा हुबळी विमानतळाला होताना दिसत आहे. तातडीने बेंगळूरला जाणारे प्रवासी हुबळी गाठत आहेत. त्यामुळे 80 कि.मी.चा प्रवास करून हुबळी गाठावी लागत असल्याने बेळगावमधूनच विमानफेऱया वाढविण्याची मागणी होत आहे.









