बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हे भारतातील सर्वात राहण्याजोगे शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे, त्यानंतर पुणे, अहमदाबाद, चेन्नई आणि सूरत यांचा क्रमांक लागतो.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विभाग मंत्रालयच्या वतीने गेले काही वर्ष अशा पद्धतीचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं आणि त्या पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांचे मूल्यमापन केले जाते. हे मूल्यमापन करत असताना त्या शहरातील हवामान पायाभूत सुविधांची उपलब्धता, घरांची उपलब्धता, रोजगार देणाऱ्या साधनांची उपलब्धता अशा अनेक पातळ्यांवर तपासणी केली जाते.
या सर्वेक्षणात दहा लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४९ शहरांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दिल्ली १३ व्या क्रमांकावर आहे. या यादीच्या तळाशी अमृतसर, गुवाहाटी, बरेली, धनबाद आणि श्रीनगर आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी जाहीर केलेल्या निर्देशांकानुसार, दशलक्षाहूनही कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिमला अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर भुवनेश्वर, सिल्वासा, काकीनाडा आणि सालेमचा क्रमांक लागतो. ६२ शहरांच्या यादीमध्ये तळाशी अलिगड, रामपूर, नामची, सतना आणि मुझफ्फरपूर यांचाही समावेश आहे.









