बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) गुरुवारी राजराजेश्वरनगर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी कोरोना पॉझिटिव्ह आणि संक्रमित संशयित रुग्ण मतदारांना ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ ते सायंकाळी ६ या दरम्यान मतदान करण्याची मुभा देण्यात येईल असे म्हंटले आहे.
बीबीएमपीचे आयुक्त एन. मंजुनाथ प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदारसंघातील ६७८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. आर. आर. नगरमध्ये बुधवारी १,१७७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर ८४२ जणांना घरात अलग ठेवण्यात आले होते, इतर ३१७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि १८ जण कोविड केअर सुविधांमध्ये होते. २ नोव्हेंबरपर्यंत पॉझिटिव्ह चाचणी असलेल्या सर्वांचा डेटा गोळा केला जाईल आणि मतदारांना मतदासाठी परवानगी दिली जाईल. पॉझिटिव्ह रुणांना रुग्णवाहिकेमधून मतदान केंद्रावर आणले जाईल, असे प्रसाद यांनी म्हंटले आहे.
रुग्णवाहिका सेवेचा उपयोग करण्यासाठी आणि ज्यांना कोरोना असल्याची शंका असल्यास त्यांनी 080-28600954 / 28604331/28601050/94822 24474 वर कॉल करू शकता असे बीबीएमपीच्या निवेदनात नमूद केले आहे.









