वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील रविवारी येथे झालेल्या 114 व्या सामन्यात बेंगळूर बुल्सने जयपूर पिंक पँथर्सचा 45-37 अशा गुणांनी पराभव केला. दुसऱया एका सामन्यात पिछाडीवर असलेल्या हरियाणा स्टिलर्सने मुसंडी मारत बलाढय़ यू मुंबा संघावर 37-26 अशा गुणांनी विजय मिळविला.
बेंगळूर बुल्स आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील सामन्यात बेंगळूर बुल्स संघातील प्रमुख रायडर्स भरत आणि पवन सेहरावत यांची कामगिरी दर्जेदार झाली. भरतने 15 गुण तर पवनने सुपर 10 गुण मिळविले. या स्पर्धेत प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी चालू असलेल्या शर्यतीमध्ये बेंगळूर बुल्सला हा विजय महत्त्वाचा ठरला आहे. बेंगळूर बुल्सने हा सामना 8 गुणांच्या फरकाने जिंकला. जयपूर संघाला प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी एकही गुण मिळाला नाही. रविवारच्या सामन्यात जयपूर संघातर्फे अर्जुन देसवालने सुपर 10 गुणांसह एकूण 16 गुण मिळविले. सामन्यातील 10 व्या मिनिटाला जयपूर पँथर्स संघाने आघाडी मिळविली होती. दरम्यान बेंगळूर संघातील बचावफळीत खेळणाऱया जयदीपने आपल्या संघाला पहिल्यांदा सर्वगडी बाद होण्यापासून वाचविले. 14 व्या मिनिटाला बेंगळूर बुल्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद झाल्याने जयपूरने पाच गुणांची आघाडी मिळविली पण त्यानंतर भरतच्या शानदार कामगिरीमुळे जयपूर पिंकचे सर्वगडी बाद झाले. दोन्ही संघ 18-18 असे बरोबरीत होते. सामन्याच्या मध्यंतराला बेंगळूरने जयपूरवर 22-19 अशा तीन गुणांची आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात जयपूरचे दुसऱयांदा सर्वगडी बाद झाल्याने बेंगळूर संघाने 7 गुणांची आघाडी घेतली होती. अर्जुन देसवालने बेंगळूर बुल्सचे सर्वगडी बाद करून सुपर दहा गुण मिळविले. बेंगळूरच्या भरतने सुपर 10 गुण घेत जयपूर संघावर दडपण आणले. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना बेंगळूर संघने आठ गुणांची आघाडी मिळविली होती. बेंगळूर संघाने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान संपुष्टात आणले.
रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात हरियाणा स्टिलर्सने बलाढय़ यू मुंबाचा 37-26 अशा 11 गुणांच्या फरकाने पराभव केला. हरियाणा स्टिलर्सतर्फे कर्णधार विकास कंडोला आणि आशिष नरवाल यांची कामगिरी दर्जेदार झाली. कंडोला आणि नरवाल यांनी एकूण 27 गुण मिळविले. सामन्यातील पहिल्याच चढाईवर कंडोलाने हरियाणाला 1 गुण मिळवून दिला. 12 व्या मिनिटाला हरियाणाने यू मुंबावर 6-5 अशी आघाडी घेतली होती. विकास कंडोलाच्या शानदार चढाईमुळे यू मुंबाचे सर्व गडी बाद झाल्याने हरियाणाने 14-6 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरावेळी हरियाणाने यू मुंबावर 18-13 अशा पाच गुणांची बढत मिळविली होती. दरम्यान यू मुंबाने सामन्याच्या उत्तरार्धात हरियाणा स्टिलर्सचे पहिल्याच मिनिटानला सर्वगडी बाद केल्याने हरियाणा संघ पिछाडीवर राहिला. सामना संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना हरियाणा स्टिलर्सने यू मुंबा संघावर 24-22 अशी दोन गुणांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर कर्णधार विकास कंडोलाने सुपर दहा गुण नोंदवित आपल्या संघाची आघाडी 29-23 अशी वाढविली. एक मिनिट बाकी असताना हरियाणा स्टिलर्सने यू मुंबाचे सर्व गडी बाद केले आणि अखेरीस आशिष नरवालने आपल्या चढाईवर दोन गुण मिळवित हरियाणा संघाला हा सामना 37-26 अशा 11 गुणांच्या फरकाने जिंकून दिला.









