बेंगळूर/प्रतिनिधी
एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून व्हिडीओ बनवणाऱ्यांना बेंगळूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करत आरोपींना पकडण्यासाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध बेंगळूरातील राममूर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान राममूर्ती नगरमध्ये एका महिलेवर कथित बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी बेंगळूर पोलिसांनी गुरुवारी ६ जणांना अटक केली आहे. आसाममधील सोशल मीडियावर या घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित हे बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांचा विश्वास आहे.
राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याविषयी बोलताना, एफआयआरमध्ये पीडितेचे नाव नव्हते. कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांत ५ ते ६ लोकांना अटक करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
तसेच याविषयी माहिती देताना पूर्व बेंगळूर शहर, डीसीपी डॉ. शरणाप्पा एसडी यांनी आत्तापर्यंत ६ आरोपी -४ पुरुष आणि २ महिलांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आम्हाला आढळले आहे की पीडित आणि आरोपी एकमेकांना परिचित आहेत. आरोपींची विचारपूस केली जात आहे, असे ते म्हणाले.