बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी बेड अभावी रुग्णांना रुग्णालयाबाहेर ताटकळत थांबावे लागत आहे. बेडच्या उपलब्धतेविषयी प्रश्नचिन्ह असताना कर्नाटक पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने बुधवारी बेंगळूर येथील कोविड बेड वाटप घोटाळ्याप्रकरणी एकूण चार आरोपींना अटक केल्याची माहिती बुधवारी दिली. आरोपी आर्थिक परिस्थिती पाहून रुग्णांना बेड उपलब्ध करून दिला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान सह पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात दाखल झालेल्या दोन एफआयआर सीसीबीकडे वर्ग करण्यात आल्या. “आम्ही आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. इतर ४ जणांची चौकशी केली जात आहे. आठही विभागीय कक्षांमध्ये शोध घेण्यात आला आहे,” असे पाटील म्हणाले.
मंगळवारी डीसीपी (दक्षिण) हरीश पांडे यांनी नेत्रावती (वय ४०) आणि तिचा पुतण्या रोहित कुमार (वय २२) यांना बेड-बुकिंग घोटाळ्यात अटक केल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर या दोघांना अटक करण्यात आली.
दरम्यान पोलीस पथकाने कोविड -१९ रूग्णाचे नातेवाईक म्हणून बेडसाठी त्यांच्याकडे संपर्क साधला. तेव्हा आम्हाला समजले की आर्थिक परिस्थिती पाहून आरोपी २ ते ४ लाख रुपये घेऊन बेड देत आहेत, असे ”पांडे यांनी सांगितले.