बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दररोज ५० हजारापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. देशात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई, दिल्लीलाही मागे टाकत बेंगळूरमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा कोरोनात महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. परंतु सेवा बजावत असताना अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, बेंगळूरमधील सुमारे १,२२१ पोलिसांना दुसर्या लाटेत कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी ३१ पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यापैकी २४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते तर चौघांनी फक्त पहिला डोस घेतला आहे. लस घेऊनही बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या पोलिसांची ८०३ सक्रिय प्रकरणे आहेत. त्यापैकी ७५५ पोलीस घरीच अलग राहून उपचार घेत आहेत. सोमवारी एकूण ४० जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४०७ पोलीस कर्मचार्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे बेंगळूर पोलिसांनी सांगितले.