एकीकडे परिस्थिती हाताळण्याबरोबरच दुसरीकडे दुर्बल घटकांना जगविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद ठरली आहे. ही धडपडच सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांना तारून नेणारी ठरली आहे. कारण लॉकडाऊन शिथिल होताच कर्नाटकात आणखी एका बंडाळीला सुरुवात झाली आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येने 4 हजाराचा आकडा पार केला आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी परराज्यातून येणाऱया प्रवाशांमुळे रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. चालू महिन्याअखेर कर्नाटकात 10 हजारहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधक यंत्रणा राबविली. याकामी ते स्वतःच आघाडीवर होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एकीकडे परिस्थिती हाताळण्याबरोबरच दुसरीकडे दुर्बल घटकांना जगविण्यासाठी त्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद ठरली आहे. ही धडपडच सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांना तारून नेणारी ठरली आहे. कारण लॉकडाऊन शिथिल होताच कर्नाटकात आणखी एका बंडाळीला सुरुवात झाली आहे.
माजी मंत्री उमेश कत्ती यांनी बेंगळूर येथील आपल्या निवासस्थानी उत्तर कर्नाटकातील आमदारांसाठी भोजनावळीचे आयोजन केले होते. मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे धाकटे बंधू रमेश कत्ती यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही. त्यावेळीच त्यांनी पक्षश्रे÷ाrंविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला होता. स्वतः येडियुराप्पा यांनी बेळगावला येऊन त्यांची मनधरणी केली होती. त्यामुळे त्यांचे बंड थंड झाले होते. आता ते पुन्हा बंडाच्या पवित्र्यात आहेत. आता तर ज्यांना ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्या सर्वांनी एकत्र येऊन येडियुराप्पा हटाव मोहीम सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांनाच बदलले तर ठीक नाहीतर आमचा मार्ग मोकळा आहे, असा पवित्रा बंडखोर घेणार, अशी अपेक्षा होती. मात्र, कर्नाटकातील या बंडाळीला खतपाणी न घालण्याचा निर्णय पक्षश्रे÷ाrंनी घेतला आहे.
राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांची राज्यसभेवरील मुदत संपत आली आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणार, अशी अटकळ आहे. त्यांची संधी हिरावण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे. खरेतर भाजपला पूर्ण प्रमाणात जनादेश मिळाला नव्हता. काँग्रेस-निजद युतीला खिंडार पाडून येडियुराप्पांनी आपल्या सत्तेचा राजमार्ग तयार केला होता. काँग्रेस-निजदला रामराम ठोकून ज्यांनी भाजपची कास धरली, त्यांना मंत्रिपद देणे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त होते. एक-दोन अपवाद वगळता बहुतेकांचे त्यांनी समाधानही केले आहे. त्यामुळे पक्षातील नि÷ावंतांना डावलावे लागले आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी असे करणे भाजपला अनिवार्य होते. मात्र, ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते सर्व असंतुष्ट आता एकत्र आले आहेत. भाजपची सत्ता येऊन वर्ष पूर्ण व्हायला आले आहे. त्याआधीच मंत्रिपदासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. या धडपडीतूनच जेवणावळी रंगल्या आहेत.
उमेश कत्ती यांची ज्ये÷ता लक्षात घेता त्यांना मंत्रिपद मिळणारच आहे. आता रमेश कत्ती यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. लोकसभेची उमेदवारी नाकारताना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मुख्यमंत्र्यांनी आपला दिलेला शब्द पाळावा, अशी भूमिका कत्ती बंधूंनी मांडली आहे. याच मुद्दय़ावर काँग्रेस-भाजपमध्येही कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसमधील आणखी किमान 25 आमदार राजीनामे देण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्र्यांनी होकार दिला तर आपण हा प्रयोग घडवून आणू शकतो, असे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. तर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी भाजपमध्ये पक्षांतर्गत बंडाळी माजली आहे. कर्नाटकात दोन मुख्यमंत्री कार्यरत आहेत. एक घटनात्मक हक्काने काम करतात तर दुसरे आपण मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरतात, अशी टीका केली आहे. ही टीका मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव विजयेंद्र यांना उद्देशून आहे. ही टीका करतानाच पक्षांतर्गत बंडाळीमुळे भाजप सरकार कोसळले तर त्याला काँग्रेस जबाबदार राहणार नाही, अशी पुस्तीही सिद्धरामय्या यांनी जोडली आहे.
सध्याच्या राजकीय घडामोडी लक्षात घेता उमेश कत्ती यांच्या जेवणावळीवरून राजकीय वातावरण तापले असले तरी सरकारला धक्का पोहोचेल, अशी सध्या तरी परिस्थिती निर्माण झालेली नाही. जेवणावळीत भाग घेतलेल्या आमदारांनीही आपापल्या सोयीनुसार भूमिका घेतली आहे. लॉकडाऊनमुळे राजधानीत हॉटेल्स बंद होती. अशा परिस्थितीत आम्ही जेवणासाठी कोठे जाणार? उमेश कत्ती यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत माझ्या घरीच जेवणाला या, असे सांगितले होते. म्हणून त्या जेवणावळीत आम्ही भाग घेतला आहे. याला बंडाळी मानायचे कारण नाही, अशी मवाळ भूमिका काही आमदारांनी घेतली आहे तर मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱया आणखी काही जणांनी होय आम्ही नेतृत्वावर नाराज आहोत, त्याविषयी चर्चा करण्यासाठी एकत्र आलो होतो, असे जाहीरपणे कबूल केले आहे.
काँग्रेस-निजद युती सरकारचा पाडाव होण्यासाठी बेळगावतूनच बंड झाले होते. आताही उमेश कत्ती यांच्या माध्यमातून बेळगावातून बंडाची सुरुवात होऊ लागली आहे. त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे दिसते. हुबळी-धारवाडच्या जगदीश शेट्टर यांच्यावर बेळगाव जिल्हय़ाच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता यामध्ये बदल करून रमेश जारकीहोळी यांच्या खांद्यावर पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. आमची कामे होत नाहीत. अधिकारी आमचे ऐकत नाहीत, अशा अनेक आमदारांच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारीही दूर करण्यासाठी येडियुराप्पा यांची धडपड सुरू झाली आहे. रमेश कत्ती यांना राज्यसभेची उमेदवारी व स्वतःसाठी मंत्रिपदाची मागणी केली तर यापैकी एकतरी पदरात पडते, याचा अंदाज उमेश कत्ती यांना नक्की आहे. त्यामुळेच जेवणावळीचे राजकारण रंगले आहे. ते केवळ शक्तीप्रदर्शनासाठी मर्यादित राहिले. त्याला बंडखोरीचे स्वरुप अद्याप तरी प्राप्त झाले नाही. कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्नाटकातील हे बंड सुरू होण्याआधीच शमावे, अशी अपेक्षा सामान्य जनतेमध्ये आहे. कारण कोरोनाचा सामना करण्यासाठी येडियुराप्पा यांनी केलेली धडपड त्यांना सुरक्षाकवच देणारी ठरली आहे.








