पाच जणांना अटक : पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेंगळूर
व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) आणि पुरातन वस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱया टोळीला बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी गजाआड केले आहे. पाच जणांच्या या टोळीकडून तब्बल 80 कोटी रुपये किमतीचे 80 किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रीस, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेड मर्क्युरीच्या तांब्याच्या बाटल्या, स्टीम फॅन असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
बेंगळूरमधील मजीब पाशा (वय 48), महम्मद मुन्ना (वय 45), गुलाब चंद (वय 40) आणि रायचूरमधील संतोष जगन्नाथाचार (वय 52) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याजवळून जप्त करण्यात आलेले अंबरग्रीस हे अत्यंत किमती वस्तू असून त्याचा वापर सुगंधी द्रव्य, अत्तर तयार करण्यासाठी वापरला जातो. बेंगळूरमध्ये आर. एम. के. एन्टरप्रायझेसच्या नावाने उघडण्यात आलेल्या कार्यालयात त्याची विक्री करण्यात येत होती.
बेंगळूरच्या बागलगुंटे पोलीस स्थानक हद्दीतील आर. एम. के. एन्टरप्रायझेसमध्ये अंबरग्रीस ठेवण्यात आले होते. त्याची किंमत किलोला 1 कोटी रुपयाहून अधिक असल्याचे सांगून लोकांना त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती सीसीबी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने ग्राहकाचे सेंग घेऊन छापा टाकला. यावेळी पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तसेच मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार असून त्याचा शोध जारी आहे. बागलगुंटे पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सीसीबीचे आयुक्त संदीप पाटील यांनी दिली.
अंबरग्रीस म्हणजे काय?
अंबरग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी. त्याचा वापर उत्तम दर्जाची सुगंधी द्रव्ये, अत्तर उत्पादनात केला जातो. इतकेच नव्हे; तर अंबरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. त्यापासून तयार केलेले अत्तर लाखो रुपयांना विकत घेतले जाते. अत्तरामध्ये व्हेल माशाच्या उलटीचा वापर फिक्सेटिव्ह म्हणजेच स्थिरीकरण द्रव्य म्हणून वापरतात. पर्फ्युम किंवा अत्तराचा सुगंध दीर्घकाळ टिकावा, यासाठी फिक्सेटिव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत. पण, त्याचा शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. परंतु, व्हेल माशाची उलटी नैसर्गिक असल्याने त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला विदेशात मोठी मागणी आहे.