फोटो फ्रेममधून विदेशात पाठविण्यात येत होते
बेंगळूर
देशभरात अमली पदार्थविरोधी कारवाई सुरूच असून सोमवारी बेंगळूरमध्ये डीआरआय (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) च्या अधिकाऱयांनी 13 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहे. फोटो फ्रेम, फोटो अल्बम आणि बांगडय़ांमध्ये लपवून ड्रग्जची अवैधपणे वाहतूक करण्यात येत होती. याचा सुगावा लागताच डीआरआयच्या पथकाने कारवाई करत ड्रग्ज जप्त केले आहे.
कोणाला संशय येणार नाही अशा पद्धतीने ड्रग्ज बेंगळूरमधून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येत होते. ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती मिळताच ते पार्सल पुन्हा बेंगळूर विमानतळावर मागविण्यात आले. पार्सल उघडून पाहणी केल्यानंतर फोटोप्रेममध्ये ड्रग्ज असल्याचे आढळून आले. ड्रग्ज माफियांनी अमली पदार्थाची वाहतूक करण्याच्या उद्देशानेच फोटोप्रेममध्ये विशिष्ट पद्धतीने कंपार्टमेन्ट तयार केले होते. चेन्नईतून बेंगळूरमार्गे त्याची ऑस्ट्रेलियाला वाहतूक होत होती.









