बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. कोरोनाने अनेक राजकीय नेत्यांबरोबर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील सोडलेले नाही. यामध्ये बेंगळूरच्या १५०० हुन अधिक पोलीस अधिकारी आणि जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे.
एका फाउंडेशनतर्फे आयोजित ‘रिबूट नम्मा बेंगळूर’ या विषयावर वेबिनारमध्ये बोलताना कमल पंत यांनी आजवर बेंगळूर शहर पोलिसांमधील १५०१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे आणि दुर्दैवाने त्यापैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता बहुतांशी पोलीस कोरोनमुक्त झाले आहेत. एकूण रुग्णांपैकी १,१०० पोलीस कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.