बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर आणि जिल्हा मुख्यालयात गरजू रूग्णांना मदत करण्यासाठी काँग्रेसने हेल्पलाईन आणि कोविड कंट्रोल रूम सुरू करण्याची योजना आखली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य कार्यकर्त्यांसमवेत आभासी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी, कोविड -१९ प्रसार रोखण्यास मदत करण्यासाठी काँग्रेसही सहभागी होणार असल्याने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान हेल्पलाईन आणि नियंत्रण कक्ष रूग्णांना रूग्णवाहिका, रूग्णालयातील बेड, ऑक्सिजन आणि औषधे मिळविण्यात मदत करेल. तसेच पक्षाने वैद्यकीय तज्ञांची एक टीम तयार करण्याची देखील योजना आखली आहे. जे सल्लामसलत करण्यासाठी उपलब्ध असतील. याचबरोबर गरजूंना खाद्याची पाकिटेही पुरवली जाणार आहेत.









