बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी राज्य सरकारने केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केला आहे. दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यातही पालिकेने बाहेरून येणाऱ्यांना कठोर नियम लागू केले आहे. आता तर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीचा कर्फ्यू वाढवला आणि शहरात कलम १४४ (१) लागू केले आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की रात्रीची संचारबंदी रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. सीआरपीसीचे कलम १४४ (१) लागू केले असून सार्वजनिक ठिकाणी चार किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे आणि दुकाने आणि मॉल उघडे ठेवण्याव्यतिरिक्त इतर हालचालींवर प्रतिबंधित करते, असे बेंगळूर पोलिसांनी सांगितले.
कर्नाटकात बुधवारी १,७६९ नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि राज्यात सक्रिय रुग्णसंख्या २४,३०५ वर गेली आहे. बेंगळूरमध्ये ४११ नवीन संसर्गाची नोंद झाली असून, सह्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या ८,७०५ वर गेली आहे.









